Friday, 19 May 2017

शाहिस्तेखान छापा (५ एप्रिल १६६३)

बाजी प्रभू देशपांडे यांच्या अतुलनीय पराक्रमामुळे शिवाजी महाराज सुखरूप विशाळगडावर पोचले. पुण्यात लाल महालात शाहिस्तेखान घुसला होता. त्याच्या फौजा पुण्याची बरबादी करीत होत्या. शाहिस्तेखानाला पुण्यातून पळवून लावणे हे आता शिवाजी महाराजांसमोरील तातडीचे काम होते.
त्यांनी त्यासाठी एक धाडसी योजना आखली. प्रत्यक्ष खानाच्या छावणीत शिरून त्याची गर्दन छाटण्याचे त्यांनी ठरविले. काही लाख सैनिक असलेल्या छावणीत शिरून,लाल महालासाराख्या सुरक्षित जागी बसलेल्या खानची गर्दन उडविणे हे काही ेसोपे काम नव्हते.
निवडक दोन हजार स्वरांची कुमक घेऊन स्वत: शिवाजी महाराज या मोहिमेवर निघाले. बिनीवर बाबाजी आणि चिमणाजी हे खेडचे देशपांडेकुलकर्णी (CKP) भाऊ आणि त्यापाठोपाठ खासा राजर्षी होते. त्यांच्यामागून नेताजी पालकर आणि मोरोपंत पेशवे होते. बाबाजी आणि चिमणाजी यांचे वडील बापुजी देशपांडे हे महाराजांच्या बालपणी लाल महालात चाकरी करीत होते. त्यामुळे बाबाजी/चिमणाजी हे महाराजांची बालमित्र..अगदी जानी दोस्त. त्यांना पुण्याची आणि लाल महालाची अगदी खडानखडा माहिती होती. नेताजी पालकर आणि मोरोपंत पेशवे यांच्या नेतृत्वाखाली दोन तुकड्यात विभागणी करून हे स्वार छावणीत घुसले.
सर्वात पुढे बाबाजी आणि चिमणाजी होते. त्यांची कामगिरी सर्वात कठीण होती. जागोजागी चौकी पहारे होते. त्यांना या बंधूंनी ते चौकी पहारा सांभाळणारे मोगल सेनेतील लोकच आहेत हे पटवून दिले. बाबाजी आणि चिमणाजी यांनीच आपापल्या तुकडीला लाल महालात पहारे चुकवून आत घुसविले.
मुदपाकखान्यातून खानाच्या शामियान्याकडे जाण्याचा रस्ता होता. पण तो विटांनी बंद केला होता. त्या विटांची भिंत फोडून जावे लागले. त्यामुळे आवाज होऊन खानाला कोणीतरी शिरल्याचा पत्ता लागला. तेवढ्यात कोणा बेगमेने दिवे घालविले. त्यामुळे अंधारात खान पळून जाऊ लागला. पण या झटापटीत शिवाजी महाराजांच्या तलवारीने खानाची तीन बोटे तुटली. शिवाजी महाराजांचे सैन्य पळून गेले.
यामुळे घाबरून खानाने आपला मुक्काम हलविला आणि तो दिल्लीला पळून गेला.
बाबाजी आणि चिमणाजी देशपांडे यान CKP बंधूंची कामगिरी या लढाईत अत्यंत मोलाची होती. बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या शिवचरित्रात या बंधूंची खूप स्तुती केली आहे.

Monday, 8 May 2017

घोडखिंडीतील पराक्रम (१३ जुलै १६६०)

घोडखिंडीतील बाजी प्रभू देशपांडे यांच्या अतुलनीय पराक्रमामुळे CKP समाजाची मान उन्नत झाली आहे. (सध्या काहीजण बाजी प्रभू देशपांडे हे ब्राह्मण असल्याचा समज पसरवित आहेत).
बाजी प्रभू देशपांडे यांचे आजोबा आणि वडील शहाजीराजांच्या सेवेत असल्याचे आपण पहिल्या भागात पाहिले. ते शहाजीराजांसोबत आदिलशाही चाकरी करीत होते. बाजी प्रभू देशपांडे हे ही आदिलशाही चाकरीत होते. हिरडस मावळचे देशमुख बांदल यांचेकडे बाजी प्रभू देशपांडे 'देशपांडे' या नात्याने  सेवा देत होते. बांदल देशामुखाने शिवाजीमहाराजांचे आधिपत्य मानण्यास नकार दिला. त्यामुळे शिवाजीमहाराजांच्या सेनेबरोबर झालेल्या युद्धात महाराजांनी हा हिरा जोखला आणि त्यांना आपल्यासोबत येण्याचे सुचविले. यानंतर अखेरपर्यंत बाजी प्रभू देशपांडे महाराजांबरोबर सावलीसारखे राहिले.
अफझलखानवधानंतर लगेचच शिवाजी महाराजांचे सैन्य एक CKP : सरनौबत नेताजी पालकर यांच्या अधिपत्याखाली कोल्हापूर आणि परिसरातील आदिलशाही प्रदेश आपल्या ताब्यात घेत सुटले. पन्हाळगडावर ताबा मिळविला. अफझालाखानाचा पराभव आदिलशाहीच्या जिव्हारी लागला. त्यामुळे आदिलशहाने आपल्या सिद्दी जौहर या सरदारास प्रचंड फौजफाट्यासह शिवाजी महाराजांच्या पारिपत्यासाठी पाठविले. शिवाजीमहाराजांनी आपला मुक्काम पन्हाळगडावर हलविला. सिद्दी जौहरने पन्हाळ्यास वेढा घातला. अफझालाखानाच्या अनुभवानंतर सिद्दी अत्यंत जागरूक होता. पावसाळ्यातही वेढा ढिला पडणार नाही याचे त्याने उत्तम व्यवस्था केली होती. आसपासच्या किल्ल्यांवरून शिवाजीला मदत मिळू नये म्हणून त्यांनाही त्यावे वेढा घातला होता. इंग्रजांची लांब पल्ल्याच्या तोफांची मदतही त्याने मिळविली होती.
आदिलशाहने याचे वेळी शिवाजीला आवळण्यासाठी मुघलांची मदत मागितली. औरंगजेबाने आपल्या मामाला - शाहिस्तेखानाला शिवाजीवर पाठविले. शाहिस्तेखानाने पुण्यावर कब्जा करून लाल महालात मुक्काम ठोकला. अशाप्रकारे दोन बलाढ्य शत्रूंकडून एकाच वेळी शिवाजी महाराजांची कोंडी झाली.
शिवाजीमहाराजांनी पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटून जाण्याचे ठरविले. आपण शरण येत असल्याचा निरोप त्यांनी सिद्दी जौहरला पाठविला. त्यामुळे वेढ्यात शिथिलता आली. आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला तुफान पावसात शिवाजी महाराज वेढ्यातून पळाले. पण सिद्धीच्या हेरांना याचा सुगावा लागला. सिद्दी जौहरने आपला जावई सिद्दी मसूद याला दोन हजार घोडदळ आणि हजार पायदळासह शिवाजीमहाराजांच्या मागावर पाठविले. वाटेत घोडखिंडीपाशी या फौजेने शिवाजी महाराजांना गाठले. अजून विशाळगड पाच कोस दूर होता. त्याच्याभोवती शत्रूचा वेढा होता. हा वेढा तोडून जायचे होते. बाजी प्रभू देशपांडे यांनी तीनशे मावळ्यांसह तीन हजार फौजेला घोडखिंडीपाशी सहा तास अडवून धरले. रात्री वेढा तोडून निघाल्यापासून सतत तेवीस तास बाजी प्रभू आपल्या सहकाऱ्यांसह चालत होते/लढत होते. शिवाजीमहाराज विशालगडावर सुखरूप पोचल्यावर ठरल्याप्रमाणे पाच तोफा गडावरून उडविण्यात आल्या. तोफांचा आवाज ऐकल्यानंतरच आपला धनी सुखारूप पोचल्याची खात्री पटल्यावरच जखमी बाजी प्रभूंनी प्राण सोडले.
बाजी प्रभू देशपांडे यांच्याबरोबरच त्यांचे सख्खे बंधू पिलाजी प्रभू हे ही या लढाईत हुतात्मा झाले.
स्वामीनिष्ठा आणि पराक्रमामुळे बाजी प्रभू आणि पिलाजी प्रभू यांनी CKP समाजाला मानाच्या अत्युच्च शिखरावर नेऊन ठेवले.

सोबत : बाजी प्रभू देशपांडे आणि पिलाजी प्रभू यांच्या समाधीचा फोटो.

Saturday, 6 May 2017

अफझलखान स्वारी

Image result for अफझलखान स्वारीशिवाजीमहाराजांनी अफझलखान या आदिलशाही बलाढ्य सरदाराला ठार मारले. या प्रसंगातही एका CKP बहाद्दराने कळीची भूमिका बजावली होती.
जावळी हातात आल्यावर शिवाजी महाराजांनी लगेचच तेथे प्रतापगड किल्ला बांधला. त्यानंतर आदिलशाही आणि निजामशाहीतील किल्ले हस्तगत करीत सुटले. याच सुमारास मुहम्मद अदिलशहाचा मृत्यू झाला. अदिलशहाची आई बडी बेगमा हिच्या हातात सत्ता आली. बडी बेगमा ही पाताळयंत्री बाई होती. शिवाजीमहाराज आदिलशाही मुलुखात गोंधळ घालीत असल्यामुळे ती खवळली होती. आदिलशाही दरबारात अफझलखान हा शूर सरदार होता. प्रत्यक्ष औरंगजेब त्याच्या तावडीतून एकदा दैवयोगाने निसटला होता. शिवाजीमहाराजांना दगा करून ठार मारण्याचा गुप्त हुकुम अफझलखानाला मिळाला होता. त्याच्याबरोबर बाराशे उंट, पासष्ठ हत्ती, असंख्य तोफा, पालख्या, भोई, नोकर-चाकर आणि शूर सरदाराना शिवाजीमहाराजांच्या पारिपत्य करण्याच्या मोहिमेवर धाडण्यात आले. मोठा खजिना त्यासाठी देण्यात आला. तीन वर्षे पुरेल एवढा खजिना बरोबर होता. जावळीच्या खोऱ्याची खडानखडा माहिती असलेला, जावळीच्या लढ्यातून वाचलेला चंद्रराव मोरे हा ही या सरदारांमध्ये होता. शहाजीराजांचा चुलत भाऊही या मध्ये होता.
अफझलखान स्वभावाने क्रूर होता, धर्मवेडा होता. शिवाजीमहाराजांवर स्वारी करण्यापूर्वी त्याने तुळजापूरयेथे मंदिरे उध्वस्त केली. तुळजाभवानीवर घाव घातले.
शिवाजी महाराजांनी अफझलखानास भ्यायल्याची बतावणी करीत जावळीच्या निबिड अरण्यात अवजड सैन्यासह बोलाविले. नंतर त्यांच्या अफझलखानाबरोबर  झालेल्या भेटीत आलिंगन देण्याच्या बहाण्याने अफझलखानने त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला. पण शिवाजी महाराज सावध होते. त्यांनी कपड्याआड चिलखत घातले होते. त्यांनी लपवून सोबत नेलेल्या वाघनखांच्या (एक शस्त्र) सहाय्याने खानाचा कोथळा बाहेर काढला.
या सर्व घडामोडीत पडद्यामागे एक CKP बहाद्दर आपली कामगिरी बजावत होता. 'विश्वासराव नानाजी दिघे' हे त्याचे नाव. विशासराव हे शिवाजीमहाराजांच्या  हेरखात्याचे त्यावेळी प्रमुख होते. त्यांचे फारसी भाषेवर प्रभुत्व होते. आपले हेर त्यांनी वाई-प्रतापगड परिसरात खानच्या छावणीत पेरून ठेवले होते. खानच्या सैन्याच्या प्रत्येक हालचालीची खबर ते शिवारायापर्यंत पोचावीत होते.ते स्वत: फकिराच्या वेशात खानच्या छावणीपरिसरात फिरत होते. त्यांनीच खान काहीतरी दगाफटका करण्याच्या विचारात असून त्यामुळे भेटीच्या वेळी सावध राहण्याची सुचना महाराजांना केली होती.
तिमाजी प्रभू वैद्य आणि बाजी प्रभू देशपांडे हे शूर CKP सरदारही अफझलखान लढाईत शिवरायांबरोबर होते.

Thursday, 4 May 2017

जावळीची लढाई

शिवाजी महाराजांच्या इतिहासात जावळीच्या लढाईला अनाण्यासाधारण महत्व आहे.
जावळी हे महाबळेश्वर, मकरंदगड, मंगळगड यांच्या पहाडात वसलेले अत्यंत सुरक्षित असे संस्थान होते. अवध्याव्य पहाड, अत्यंत दाट झाडी हे जावळीचे वैशिष्ट्य. वाघ, अस्वले, चित्ते यांचा तेथे स्वैर संचार होता. येथे राज्य करायला वाघाचेच काळीज हवे. अशा या जावळीत मोऱ्यांचा पिढ्यानपिढ्या अंमल होता. ते स्वत:ला आदिलाशाहाचे सरदार म्हणावीत. 'चंद्रराव' हा मोऱ्यांना मिळालेला पिढीजात किताब होता.
या मोऱ्यांना आणखी हाव सुटली. गुंजणखोऱ्याच्या आणि रोहीडखोऱ्याच्या काही प्रदेशावर ते आपला हक्क सांगू लागले. मुसे खोऱ्यातल्या रागो त्रीमाल वाकडे या कुलकर्ण्याने  एका विधवेशी गैरकृत्य केले, त्याला चंद्रराव मोऱ्याने पाठीशी घातले. स्वराज्यातील रोहीडखोर्यातील चिखलीच्या पाटलाला आणि त्याच्या मुलाला चंद्ररावाने ठार मारले. यामुळे शिवाजी महाराजांनी जावळीवर हल्ला करण्याचे ठरविले.
परंतु जावळी आजवर अजिंक्य होता. कोणीही  दाट जंगलात पहाडात वसलेल्या जावळीवर चालून जाण्याचे धाडस केले नव्हते. शिवाजी महाराजांनी या धाडसी मोहिमेसाठी 'रघुनाथ बल्लाळ कोर्डे' यांची मोहिमेचे प्रमुख म्हणून निवड केली. त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या जावळीच्या संग्रामात हनुमंतराव मोरे मारला गेला. यशवंतराव मोरे रायरी किल्ल्यावर पळाला. प्रतापराव मोरे निसटून आदिलशहाच्या दरबारी मदत मागण्यास गेला. ही मोहीम फत्ते झाल्यावर शिवाजी महाराज स्वत: दोन महिने जावळीस मुक्काम ठोकून होते.
या लढाईत आबाजी विश्वनाथ प्रभू यांनी अतुलनीय शौर्य दाखविले. तसेच मोऱ्यांकडील एक झुंजार योद्धा मुरार बाजी देशपांडे याला शिवाजी महाराजांबरोबर येण्यास मन वळविले. बाजी प्रभू देशपांडे यांनीही जावळीच्या लढाईत पराक्रम गाजविला.
या लढाईनंतर शिवाजी महाराज यशवंतराव मोरे यांचा पाठलाग करीत रायरी किल्ल्यावर गेले. रायरी हस्तगत करून त्याचे नाव रायगड असे केले. शिवाजी महाराज यांनी यानंतर कोकण विभागाकडे मोर्चा वळविला. कोकण विभागाची व्यवस्था पाहण्यास मल्हार नारायण चौबळ यांची नेमणूक केली. जंजिरा किल्ल्याजवळ 'कांसा' किल्ला बांधण्यास त्यांनी चौबळ यांना सांगितले. मल्हार नारायण चौबळ यांनी हे काम यशस्वी रीत्या पार पाडून कोकण किनाऱ्यावरील सिद्दीच्या हालचालींना लगाम घातला.

Monday, 1 May 2017

शिवाजी महाराजांच्या तरुणपणीचा कालखंड

शिवाजीराजे तारुण्यात आले आणि त्यांनी शहाजीराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नाच्या पूर्तीसाठी प्रयत्न चालू केले. यात रोहिडेश्वर शपथ प्रसंगापर्यंत त्यांना CKP ज्ञातीतील शूरांची कशी साथ मिळत होती ते आपण गेल्या भागात पहिले.

तिमाजी रुद्राजी वैद्य
शिवाजी महाराजांनी प्रथम हस्तगत केलेल्या किल्ल्यांमध्ये 'तोरणा' हा प्रमुख किल्ला होता. या वेळी तिमाजी प्रभू वैद्य आणि त्यांची माणसे शिवाजीमहाराजांच्या सोबत होती. तिमाजी प्रभू वैद्य यांनी रायगड किल्ल्याच्या डागदुजीच्या कामातही शिवाजी महाराजांना मदत केल्याचे उल्लेख आहेत.

बापुजी मुद्गल 

कोंढाणा (सिंहगड) किल्ला सर करताना राजनैतिक वाटाघाटींमध्ये शिवाजी राजांना बापुजी मुद्गल यांची मदत झाली.

बहिर्जी कावजी देशपांडे

बहिर्जी कावजी देशपांडे यांची शिवाजी महाराजांनी लोणावळ्याजवळील राजमाची किल्ल्याचे किल्लेदार म्हणून नेमणूक केली होती. स्वराज्य स्थापनेच्या सुरुवातीच्या कालखंडात स्वराज्य भक्कम करण्यासाठी पैशांची अत्यंत आवश्यकता होती. अशा वेळी बहिर्जी देशपांडे यांनी कल्याणाच्या सुभेदाराचा विजापूरला जाणारा खजिना लुटला आणि स्वराज्यचरणी अर्पण केला. शिवाजी महाराजांना सुरुवातीच्या काळात या खजिन्याचा खूप उपयोग झाला.

स्वराज्य स्थापनेच्या सुरुवातीच्या काळात शिवाजी महाराजांबरोबर असलेले आणखी काही महत्वाचे CKP :
मल्हार साबजी प्रभू , मालजी काळू प्रभू देशपांडे, गोजाजी सोनप्रभू देशपांडे, जानोजी वैजाप्रभू देशपांडे, भानजी प्रभू देशपांडे, महादजी दामाजी दिघे, सोनाजी बापुजी प्रभू देशपांडे, एकोजी प्रभू देशपांडे, आत्माजी रुपजी प्रभू देशपांडे, महादजी रघुनाथ प्रभू देशपांडे, मालाजी प्रभू देशपांडे.

Friday, 28 April 2017

रायरेश्वराची शपथ

CKP समाजाचे राष्ट्रास योगदान - भाग ३

शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात रायरेश्वर मंदिरात १६ मे १६४५ रोजी शपथ घेऊन केली याची आपणांस बहुतेक लोकांना माहिती आहे. परंतु या शपथेशी CKP समाजाचा अत्यंत जवळून संबंध आहे याची जाणीव फारच थोड्या CKP लोकांना असते.

बाल शिवाजीराजांवर जिजाऊसाहेब संस्कार करीत होत्या.  त्यांच्यासोबत शहाजीराजांनी जबाबदारी सोपविलेले चार अधिकारी त्यांना Administration चे प्रत्यक्ष धडे देत होते. त्यात रघुनाथ बल्लाळ कोर्डे हे CKP होते हे आपण मागील लेखात पहिले.
शिवाजीराजेंनी आता तारुण्यात प्रवेश केला. स्वराज्य स्थापनेची शहाजीमहाराजांची आकांक्षा त्यांना पुरी करायची होती.

पुण्याजवळ रोहीडखोऱ्याचा प्रदेश होता. दादाजी नरस प्रभू गुप्ते हे रोहीडखोऱ्याचे देशपांडे होते. रोहीडखोरे हे आदिलशाही मुलुखात येत होते. स्वराज्याचा विचार मनात आल्यावर शिवाजी महाराजांनी दादाजी नरस प्रभू यांचे मन आपल्या सोबत येण्यास वळविले. त्यांच्या सहाय्याने प्रथम रोहिंडाकिल्ला  (विचित्रगड), तोरणाकिल्ला (प्रचंडगड) आणि राजगड तसेच चाकणभोवतालचा प्रदेश आपल्या अमलाखाली आणला.
त्यानंतर शिवाजी महाराजांनी रायरेश्वरापुढे स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. रायरेश्वर हे दादाजी नरस प्रभू गुप्ते यांच्या जहागीरीतील रोहीडखोऱ्यात होते. या शपथग्रहण प्रसंगी खालील CKP उपस्थित होते.

दादाजी नरस प्रभू गुप्ते
रघुनाथ बल्लाळ कोर्डे
दादाजी बापुजी देशपांडे
चिमणाजी बापुजी देशपांडे
विश्वासराव नानाजी देशपांडे


बालशिवाजी काल

CKP समाजाचे राष्ट्रास योगदान : भाग २ Image may contain: 1 person, outdoor
आज आपण शिवाजी महाराजांच्या काळात (१६३०-१६८०) CKP समाजाचे योगदान काय होते हे पाहण्यास सुरुवात करू. शिवाजीमहाराज आणि जिजामाता यांना शिवाजी महाराजांच्या बालवयात शहाजी राजांनी आपल्या पुणे जहागीरीची व्यवस्था पाहण्यास पाठविले. यावेळी त्यांच्या मदतीला चार जणांना पाठविले.शामराज नीलकंठ रांझेकर हे 'पेशवा' (Administrator) म्हणून, बाळकृष्ण हनुमंते यांना मुझुमदार (Accountant), सोनाजीपंत यांना 'डबीर' (Secretary) तर रघुनाथ बल्लाळ कोर्डे यांना 'सबनीस' ( Pay Master) म्हणून जबाबदारी दिली. रिसायातकार सरदेसाई यांनीही रघुनाथ बल्लाळ कोर्डे यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. अशाप्रकारे बालशिवाजी महाराजांना घडविण्यात CKP समाजाच्या रघुनाथ बल्लाळ कोर्डे यांचा हातभार लागला होता.

शहाजी राजांचा कालखंड

आपल्या समाजाने राष्ट्राला काय योगदान दिले आहे याची दुर्दैवाने आपल्या समाजास जाणीव नाही. म्हणून CKP समाजातील ज्या व्यक्तींचे मोठे योगदान आहे त्यांच्याबद्दल आपण आजपासून थोडे थोडे जाणून घेऊ या. आपण प्रथम शहाजी महाराजांपासून सुरुवात करू (१५९४ - १६६४)
पिलाजी प्रभू हे बाजी प्रभू देशपांडे यांचे आजोबा. पिलाजी हे परिंदा किल्ल्याचे किल्लेदार होते. इ.स. १६२६ नंतर निजामशाही कमकुवत झाली. तेव्हा शहाजीराजांनी स्वतंत्र होण्याचे प्रयत्न केले. तेव्हा त्यांना पिलाजी प्रभू यांची साथ होती. परंतुशहाजीराजांचे हे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत.
पिलाजी प्रभूंचा मुलगा कृष्णाजी प्रभू (बाजी प्रभू देशपांडेंचे वडील) हे शहाजी महाराजांच्या सैन्यात होते. निजामशाहीतर्फे कृष्णाजी प्रभू यांनी मुघल सैन्याशी लढा दिला आणि दख्खनचा बराच प्रदेश निजामाच्या अमलाखाली आणला. कृष्णाजी प्रभू हे शहाजी महाराजांचे विश्वासू सरदार होते. अशाप्रकारे बाजी प्रभू देशपांडे यांच्या आजोबांपासून त्यांचे कुटुंब शहाजी महाराज / शिवाजी महाराज यांच्या सेवेत होते.