Monday, 8 May 2017

घोडखिंडीतील पराक्रम (१३ जुलै १६६०)

घोडखिंडीतील बाजी प्रभू देशपांडे यांच्या अतुलनीय पराक्रमामुळे CKP समाजाची मान उन्नत झाली आहे. (सध्या काहीजण बाजी प्रभू देशपांडे हे ब्राह्मण असल्याचा समज पसरवित आहेत).
बाजी प्रभू देशपांडे यांचे आजोबा आणि वडील शहाजीराजांच्या सेवेत असल्याचे आपण पहिल्या भागात पाहिले. ते शहाजीराजांसोबत आदिलशाही चाकरी करीत होते. बाजी प्रभू देशपांडे हे ही आदिलशाही चाकरीत होते. हिरडस मावळचे देशमुख बांदल यांचेकडे बाजी प्रभू देशपांडे 'देशपांडे' या नात्याने  सेवा देत होते. बांदल देशामुखाने शिवाजीमहाराजांचे आधिपत्य मानण्यास नकार दिला. त्यामुळे शिवाजीमहाराजांच्या सेनेबरोबर झालेल्या युद्धात महाराजांनी हा हिरा जोखला आणि त्यांना आपल्यासोबत येण्याचे सुचविले. यानंतर अखेरपर्यंत बाजी प्रभू देशपांडे महाराजांबरोबर सावलीसारखे राहिले.
अफझलखानवधानंतर लगेचच शिवाजी महाराजांचे सैन्य एक CKP : सरनौबत नेताजी पालकर यांच्या अधिपत्याखाली कोल्हापूर आणि परिसरातील आदिलशाही प्रदेश आपल्या ताब्यात घेत सुटले. पन्हाळगडावर ताबा मिळविला. अफझालाखानाचा पराभव आदिलशाहीच्या जिव्हारी लागला. त्यामुळे आदिलशहाने आपल्या सिद्दी जौहर या सरदारास प्रचंड फौजफाट्यासह शिवाजी महाराजांच्या पारिपत्यासाठी पाठविले. शिवाजीमहाराजांनी आपला मुक्काम पन्हाळगडावर हलविला. सिद्दी जौहरने पन्हाळ्यास वेढा घातला. अफझालाखानाच्या अनुभवानंतर सिद्दी अत्यंत जागरूक होता. पावसाळ्यातही वेढा ढिला पडणार नाही याचे त्याने उत्तम व्यवस्था केली होती. आसपासच्या किल्ल्यांवरून शिवाजीला मदत मिळू नये म्हणून त्यांनाही त्यावे वेढा घातला होता. इंग्रजांची लांब पल्ल्याच्या तोफांची मदतही त्याने मिळविली होती.
आदिलशाहने याचे वेळी शिवाजीला आवळण्यासाठी मुघलांची मदत मागितली. औरंगजेबाने आपल्या मामाला - शाहिस्तेखानाला शिवाजीवर पाठविले. शाहिस्तेखानाने पुण्यावर कब्जा करून लाल महालात मुक्काम ठोकला. अशाप्रकारे दोन बलाढ्य शत्रूंकडून एकाच वेळी शिवाजी महाराजांची कोंडी झाली.
शिवाजीमहाराजांनी पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटून जाण्याचे ठरविले. आपण शरण येत असल्याचा निरोप त्यांनी सिद्दी जौहरला पाठविला. त्यामुळे वेढ्यात शिथिलता आली. आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला तुफान पावसात शिवाजी महाराज वेढ्यातून पळाले. पण सिद्धीच्या हेरांना याचा सुगावा लागला. सिद्दी जौहरने आपला जावई सिद्दी मसूद याला दोन हजार घोडदळ आणि हजार पायदळासह शिवाजीमहाराजांच्या मागावर पाठविले. वाटेत घोडखिंडीपाशी या फौजेने शिवाजी महाराजांना गाठले. अजून विशाळगड पाच कोस दूर होता. त्याच्याभोवती शत्रूचा वेढा होता. हा वेढा तोडून जायचे होते. बाजी प्रभू देशपांडे यांनी तीनशे मावळ्यांसह तीन हजार फौजेला घोडखिंडीपाशी सहा तास अडवून धरले. रात्री वेढा तोडून निघाल्यापासून सतत तेवीस तास बाजी प्रभू आपल्या सहकाऱ्यांसह चालत होते/लढत होते. शिवाजीमहाराज विशालगडावर सुखरूप पोचल्यावर ठरल्याप्रमाणे पाच तोफा गडावरून उडविण्यात आल्या. तोफांचा आवाज ऐकल्यानंतरच आपला धनी सुखारूप पोचल्याची खात्री पटल्यावरच जखमी बाजी प्रभूंनी प्राण सोडले.
बाजी प्रभू देशपांडे यांच्याबरोबरच त्यांचे सख्खे बंधू पिलाजी प्रभू हे ही या लढाईत हुतात्मा झाले.
स्वामीनिष्ठा आणि पराक्रमामुळे बाजी प्रभू आणि पिलाजी प्रभू यांनी CKP समाजाला मानाच्या अत्युच्च शिखरावर नेऊन ठेवले.

सोबत : बाजी प्रभू देशपांडे आणि पिलाजी प्रभू यांच्या समाधीचा फोटो.

No comments:

Post a Comment